सिंधुदुर्ग- राज्यातील पेपर फुटी प्रकरणावरुन भाजपाचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार गेली दोन वर्षात केवळ निवडणुका, पक्षबांधणीसाठी मंत्रालयात बैठका घेत आहेत. त्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक नसून ते घरी आयसीयुमध्ये बसून आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा बँक आणि नगरपंचायत निवडणूका संपल्याशिवाय जिल्ह्याबाहेर जाणार नसल्याचं देखील नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या काळात राज्य सुरक्षित नाही. भ्रष्टाचार करून पैसे सोडवणे हाच महाविकास आघाडी सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका राणेंनी केली. लघु आणि सुक्ष्म, मध्यम उद्योग खात्याच्या मंत्रालयातून देशाचं उत्पन्न वाढवणं, जीडीपी वाढवून देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जिल्ह्यात उद्योगाचं जाळं बसवणार असल्याचं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.