सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी येथे भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गुप्त बैठक घेतली. ही बैठक माजी नगराध्यक्ष संजय परब यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. उद्या, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.उद्या, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरसे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे तातडीने सिंधुदुर्ग दाखल झाले आणि सावंतवाडीत त्यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बैठक घेत निवडणुकीची व्युहरचना आखली. कणकवली येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. ते या हल्ल्यासंदर्भात काय भाष्य करतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीसही बजावली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली गुप्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 7:31 PM