मालवण , दि. ३ : कलावंतांचा अनोखा संगम कोकणच्या भूमीत आहे. भजन महोत्सवाच्या माध्यमातून संतांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होत असते. त्यामुळे भैरवी देवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन भजनी बुवा सुभाष गावडे यांनी येथे केले.
येथील बाजारपेठ संतसेना मार्गावरील श्री भैरवी देवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त भैरवी मंदिर येथे घेण्यात आलेल्या भजन महोत्सवाचा समारोप नुकताच झाला. यावेळी नाभिक समाजाचे नेते विजय सीताराम चव्हाण, अरविंद चव्हाण, तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, उत्तम चव्हाण, दिलीप वायंगणकर, राजन सकपाळ, लीलाधर चव्हाण, बबन सकपाळ, ऋषी चव्हाण, दीपक चव्हाण, किशोर चव्हाण, राजू चव्हाण, रोहन चव्हाण, जगदीश वालावलकर, ललित चव्हाण, मिहीर चव्हाण, लवू चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, उदय चव्हाण, चेतन सकपाळ, उद्देश चव्हाण, देऊ चव्हाण, तेजस चव्हाण, कौशल वस्त, ममता वायंगणकर, भाग्यश्री चव्हाण, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत विजय शिवा चव्हाण, जगदीश वालावलकर, अंकुश चव्हाण यांनी केले.
विजय चव्हाण म्हणाले, भजन, कीर्तनाने मन शुद्ध होते. भजनाच्या माध्यमातून संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. या संत विचारांवर विश्वास ठेवून आपण साºयांनी मार्गक्रमण करावे. गेली पाच वर्ष येथे भजन महोत्सव उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ गतिमान ठेवण्याचे कार्य बाळगोपाळ मंडळाच्या माध्यमातून होत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
बांबुळी (ता. कुडाळ) येथील देव ब्रह्मेश्वर महिला फुगडी संघाचा प्रदर्शनीय कार्यक्रम झाला. यावेळी विविध फुगडीतून वृक्ष लागवड, स्त्रीभृण हत्या यावर प्रबोधन करण्यात आले. वर्षा बांबुळकर यांनी केलेले सूत्रसंचालन रसिकांच्या पसंतीला उतरले होते. प्रसिद्ध ढोलकीवादक निखिल पावसकर यांच्या ढोलकी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. सूत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले. मंदिरात आकर्षक रांगोळी आणि चित्र रेखाटल्याबद्दल सत्कार करण्यात आला.