सावंतवाडी : समाज साहित्य संघटना, सिंधुदुर्ग या तळकोकणात कार्यरत असणाऱ्या साहित्य चळवळीच्या बोधचिन्हाचे अनावरण श्रीराम वाचन मंदिर येथे करण्यात आले. कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण झाले. या चिन्हाची निर्मिती मालवण येथील चित्रकार वनिता पांजरी यांनी केली आहे. यावर्षी या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर, कवयित्री कल्पना बांदेकर, प्रज्ञा मातोंडकर, विजय चव्हाण, संजना चव्हाण, प्रकाशक हरिहर वाटवे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.‘समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते. त्यामुळे साहित्यिकांनी समाजाला जोडून राहिले पाहिजे. त्यांनी तळातल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करायला हवं. आपल्या लेखनातून व्यवस्थेत हस्तक्षेप करायला हवा. कष्टकरी- शोषित वर्गाच्या हातात पुस्तक देणे याचाच अर्थ तो ज्ञानाकडे जाणे आता गरजेचे झाले आहे. या संकल्पनेतून हे बोधचिन्ह चित्रकार श्रीमती पांजरी यांनी तयार केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरु सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जून केळूसकर यांच्या स्मरणार्थ या संस्थेतर्फे यावर्षीपासून समाज साहित्य क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. त्याच बरोबर समाज साहित्य कादंबरी- कथा, कविता, समिक्षा ग्रंथांसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
समाज साहित्य संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 1:33 PM