सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे स्वबळावर निवडणूका लढविणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. संघटना नवीन असली तरी पक्ष जूना आहे.त्यामुळे लोक आम्हाला नक्कीच स्वीकारतील, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे व संदिप दळवी यांनी व्यक्त केला.ते रविवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली त्यांना मनसेकडून सक्तीची निवृत्ती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राणे म्हणाले, एरव्ही माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करण्यात माहीर असलेल्या उपरकर यांना राजीनामा देण्यास उशीर का लागला? आमच्यामुळे कोणी पक्ष सोडला असे सांगत असेल तर गेली दोन ते अडीच वर्षे ते आजारपणाचे कारण सांगून पक्षापासून दूर होते. असे आपणच सांगतात गेल्या दहा वर्षात त्यांनी खरंच पक्ष वाढवला का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेची जबाबदारी परशुराम उपरकर यांच्याकडे होती. परंतु या काळात त्यांनी पक्ष वाढवण्याचे कोणतेही काम केले नाही. उलट आपल्या भोवती पक्ष झुलता ठेवला. त्यामुळे त्याचा फटका पक्षाला बसला. नेहमी आजाराचे कारण सांगून ते पक्ष नेतृत्वापासून आणि पक्षाच्या कामापासून दूर राहिले. उलट त्यांनी संघटना वाढीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे पक्षात दोन गट पडले. यावेळी आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पक्ष नेतृत्वासह आम्हाला वेळोवेळी टाळले. दुसरीकडे आम्ही जिल्ह्यातून गेल्यानंतर एखादे आंदोलन मोर्चा करू असे इशारा देऊन त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी संघटनेचे काम सुरू ठेवले त्यामुळे हा सर्व प्रकार नेतृत्वाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना दूर करण्यात आले. असेही गजानन राणे व संदिप दळवी म्हणाले. उपरकर हे जेष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात वक्तव्य करणार नाही. परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर करतना तत्पर असलेल्या उपरकर यांना राजीनामा देण्यास वेळ का लागला? असा खोचक सवाल करीत उपरकर मनसे सोबत नसले तरी जुने पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना आम्ही नक्कीच पक्षात सामावून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, बाळा पावसकर, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गुरुदास गवंडे, सचिन सावंत आदी उपस्थित होते.