कणकवली: कणकवली नगरपंचायतीच्या ताफ्यात अद्ययावत अग्निशमन बंब दाखल होणार आहे. या बंबासाठी नगरपंचायतीने ८९ लाख रूपयांचा खर्च केला आहे. या बंबामध्ये ६ हजार लिटर पाणी क्षमता आणि १ हजार लिटर फोम अशी व्यवस्था आहे. तसेच पाणी भरण्याची स्वयंचलित व्यवस्था देखील या बंबामध्ये असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतीकडे ४ हजार लिटर क्षमतेचा अग्निशमन बंब होता. मात्र त्याची कालमर्यादा संपल्याने तो बंब आता निर्लेखित करण्यात आला आहे. त्याऐवजी आता नवा ६ हजार लिटर पाणी क्षमतेचा बंब वापरात येणार आहे. एप्रिल महिन्यात नव्या बंबासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अग्निशामक बंब उपलब्ध झाला आहे. मात्र, तो कणकवलीत दाखल होऊन सेवेत येण्यास दोन दिवस जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील इतर सर्व नगरपालिकांकडे असलेल्या बंबापेक्षा हा बंब अद्ययावत आहे.यापूर्वीच्या अग्निशामक बंबातील पाणी संपल्यानंतर कणकवली नळयोजनेकडे नेऊन त्यात पाणी भरावे लागत होते. मात्र नव्या बंबामध्ये नदी, नाले, विहिरी यामधून पाणी खेचून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे आग लागल्याच्या परिसरात पाणी उपलब्ध झाल्यास तेथेच पाणी भरून हा बंब कार्यरत होणार आहे. लवकरच आमदार नितेश राणेंच्या हस्ते या बंबाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कणकवली नगरपंचायतीला अद्ययावत अग्निशमन बंब, लवकरच लोकार्पण करणार
By सुधीर राणे | Published: July 13, 2023 12:36 PM