सिंधुदुर्गनगरी : मान्सून कालावधीत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करून मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी दिले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणअंतर्गत मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सावळकर बोलत होते. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. सावळकर म्हणाले, महसूल विभागाने जून ते आॅक्टोबर या कालावधीत नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत करण्यात यावा. नियंत्रण कक्षात आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून तालुकास्तरीय व गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात यावे. शोध व बचाव पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांचे फोन नंबरही अद्ययावत करण्यात यावेत. आपत्तीविषयक पूर्वसूचना गावस्तरापर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क यंत्रणा प्रभावी असणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ज्या घटकांकरिता आवश्यक आहे त्या घटकांकरिता आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रशिक्षण देण्याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाने करावे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शुद्ध पाणीपुरवठा, टीसीएल पुरवठ्याचे नियोजन, जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते, साकव दुरुस्तीची कामे, साथीच्या आजाराचे नियोजन व माहिती, आपत्ती काळात निवाऱ्यासाठी निवडलेल्या शाळांबाबत सद्य:स्थिती व माहिती, धोकादायक स्थितीतील शाळांची माहिती काढून योग्य ते नियोजन करावे, असे आदेश सावळकर यांनी दिले.सर्व नगरपालिका क्षेत्रात साफसफाई कामे करून नगरपालिका अखत्यारीतील रस्ते दुरूस्त करून घेण्यात यावेत. पाणीपुरवठा व स्वच्छता कामे पूर्ण करून घेण्याचे आदेश सावळकर यांनी नगरपालिकांच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांना दिले. पूर नियोजन, धोकादायक इमारतीबाबत तातडीने उपयोजना करून नगरपालिकांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले. पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन व विसर्गाचे नियोजन करावे. धूपप्रतिबंधक आराखडा अद्ययावत करून सादर करावा. पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी धोकादायक स्थितीची पूर्वसूचना देण्याबाबतचे योग्य नियोजन करण्याचे आदेशही यावेळी सावळकर यांनी पाटबंधारे विभागाला दिले. आरोग्य विभागाने साथीच्या आजाराबाबत जनजागृतीचे नियोजन करावे. आरोग्य सेविका, डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रांची यादी अद्ययावत करून कोल्हापूर व गोवा येथे पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांबाबतचे पूर्वनियोजन करून घ्यावे. पोलीस विभागाने समुद्र भरती, पूर कालावधी, रस्ते अपघात या आपत्तीच्यावेळी करावयाच्या कामांचा योग्य तो आराखडा तयार करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील धोकादायक झाडे हटविणे, महामार्गावर फलक, चिन्हे उभारणे, घाटमार्गातील रस्ते, संरक्षक कठडे याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पंचायत समिती विभागांनीही आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश सावळकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. (प्रतिनिधी)पावसाळ्यापूर्वी कामे करून घ्या बंदर अधिकाऱ्यांनी पूरप्रवण क्षेत्र, धूपप्रतिबंधक बंधारे सद्य:स्थिती व बंधारा कामांची पाहणी करून पावसाळ््यापूर्वी कामे पूर्ण करून घ्यावीत. पोहणाऱ्या व्यक्ती, जिल्ह्यातील नोंदणीकृत बोटी, यांत्रिकी बोटी यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांकासह यादी अद्ययावत करण्यात यावी. मान्सून कालावधीत मासेमारीसाठी जाऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपयोजना करण्याची पूर्वतयारी करण्यात यावी. दूरसंचार विभागाने आपत्ती कालावधीत सर्व संपर्क यंत्रणा सुरळीत राहण्यासाठीचे पूर्वनियोजन करून ठेवावे. वीजवितरण कंपनीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. कोकण रेल्वेने दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे व यादी तयार ठेवावी. तसेच त्याबाबतचे नियोजन करून आपत्कालीन पर्यायी व्यवस्थेबाबत माहिती अद्ययावत ठेवावी.
आराखडा अद्ययावत करणार
By admin | Published: April 30, 2015 9:11 PM