कसई दोडामार्ग : जिल्ह्यात बनावट नोटा सहजतेने चलनात आणण्यासाठी जुगार अड्ड्यांचा वापर होत असल्याने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील जत्रोत्सवात सुरू असलेला जुगार पूर्णत: बंद झाला होता. मात्र, जत्रोत्सवातील या अंदरबाहर जुगाराने दोडामार्ग तालुक्यात यावर्षी पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात नुकत्याच झालेल्या गावातील जत्रोत्सवात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याने जुगार खेळणाऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. याबाबत नेमकी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र, तालुक्यात जुगाराचा सिलसिला असाच कायम राहिल्यास बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात येण्याची शक्यता असून या जुगाराला वेळीच पायबंद घालण्याची मागणी होत आहे. काही वर्षांपूर्वी राज्यात बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्या होत्या. या नोटा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्या होत्या. या नोटा चलनात आणण्याचा सरळ व सोपा मार्ग म्हणजे जत्रोत्सवात चालणारा अंदर-बाहर जुगार ठरत असे. हा जुगार सुरू असताना जुगारी पैशांना फारशी किंमत देत नसल्याने चलनी नोटा तपासून घेण्यास कुणालाही वेळ नसतो. त्यामुळे जुगार अड्ड्यांमधून खोट्या नोटा राजरोसपणे चलनात येऊ लागल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी या जुगार अड्ड्यांवर प्रथमत: कठोर कारवाईचा बडगा उभारला होता. तिथपासून ते अभिषेक त्रिमुखे जिल्हा पोलीस अधीक्षक असेपर्यंत जत्रोत्सवातील जुगारावरील पायबंद कायम होता. जिल्ह्यात गेली अनेक वर्षे बंद असलेला व तालुक्याच्या शेजारील गोवा राज्यातही सध्या बंद असलेला अंदर-बाहर जुगार सुरू करण्यासाठी तालुक्यातील काही जुगार चालक व प्रशासनाशी मध्यस्थी करणारे दलाल यांनी प्रयत्न करून दोडामार्ग तालुक्यातील आयी पंचक्रोशी कोनाळ पंचक्रोशीतील काही गावातील जत्रोत्सवात हा जुगार सुरू करण्याचा घाट घालून जत्रोत्सवातील जुगारही सुरू करण्यात आला होता. त्यामुळे या जुगाराला नेमके कुणाचे अभय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु जत्रोत्सवात सुरू करण्यात येणाऱ्या जुगारामुळे बनावट नोटांचा धोका मात्र कायम होता. गोवा राज्यात या जुगारावर बंदी आणल्यामुळे गोव्यातील बऱ्याच जुगार चालकांनी आपला मोर्चा दोडामार्ग तालुक्याकडे वळविला आहे. दोन दिवसात पूर्वी तालुक्यात झालेल्या दोन जत्रोत्सवांमध्ये पुन्हा एक हजार रुपयांच्या बनावट नोटा वापरण्यात आल्याने खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जत्रोत्सवातील जुगारात एका रात्रीत लाखोची उलाढाल जुगाराच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे नोटा तपासून घेण्यासाठी कुणालाही वेळ नसतो.नेमक्या याच संधीचा फायदा घेत जुगार चालकांनी चित्रपटांत वापरण्यात येणाऱ्या पण हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या बनावट नोटा चलनात आणल्या. रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या लक्षात ही बाब आली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी याच हजाराच्या नोटा बाजारपेठेत चलनात वापरल्या असता त्या खोट्या असल्याचे आढळून आले. या नोटांवर बारीक अक्षरात सरळ लिहिलेले (ऋङ्म१ ऋ्र’े २ँङ्मङ्म३्रल्लॅ) आढळून येते.मात्र, हे लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाल्याचे याबाबत नेमकी दाद कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (वार्ताहर)जुगार चालकांवर कारवाईची मागणीतालुक्यातील जत्रोत्सवातील जुगाराला पोलिसांनी असेच अभय दिले तर यापुढे लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा जुगार चालकांवर वेळीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बनावट नोटांचा वापर
By admin | Published: January 15, 2015 10:07 PM