कणकवली : माझी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या माध्यमातून गेले चार महिने चौकशी सुरू आहे. आता माझ्या आमदार फंडातून ज्या ग्रामपंचायतींनी व ठेकेदारांनी कामे केली. त्यांना चौकशीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याला माझा आक्षेप नाही. मात्र, या चौकशीचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, अशा दबावाला आम्ही भीक घालत नाही. आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य करू. तसेच शिवसेनेचे काम जोमाने यापुढेही करीत राहू, अशी आपली भूमिका आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली आहे.याबाबत त्यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी येथील उपअधीक्षकांकडून चौकशी सुरू आहे. लाच लुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्या मालमत्तेबाबत चौकशी केली जात आहे.या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. आता माझ्या आमदार फंडातून ज्या ग्रामपंचायतींनी व ठेकेदारांनी कामे केली. त्यांना चौकशीची नोटीस पाठविण्यात आली आहे. साधारणतः २०० सामान्य लोकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांना रत्नागिरी येथे चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ही चौकशी कुडाळ येथील कार्यालयात करता आली असती; पण तसे झालेले नाही.
सामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो. त्यांनी चौकशीला सामोरे जावे. तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला अपेक्षित ती माहिती द्यावी. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही यापुढील काळात ज्यांची चौकशी करायला सांगू त्यांचीही चौकशी करावी लागेल. सत्ता ही बदलत असते, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.