कणकवली: लोकसभेची निवडणूक काही दिवसात जाहीर होणार आहे.काँगेस,राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष असे आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत निश्चित झाले आहेत. मात्र, या लोकसभा मतदार संघासाठी शिंदे गट आणि भाजपला आमच्या विरोधात अद्यापही उमेदवार मिळत नाही,हे त्यांचे अपयश आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये कुवत नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. तसेच विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत ठाकरे शिवसेना पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कणकवली येथील विजय भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत, अतुल रावराणे , निलम सावंत,शैलेश भोगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात जनतेची विविध विकासकामे मार्गी लावली. महामार्ग,चीपी विमानतळ,शासकीय मेडिकल कॉलेज अशी कामे मार्गी लावली आहेत. सर्वसामन्यांचे खासदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या मनातील खासदार म्हणून त्यांची सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कणकवली येथे ५ मार्चला बैठक होईल. या बैठकीत त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणार आहे.असेही वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक मंत्र्यांची कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी, वैभव नाईक यांची टीका
By सुधीर राणे | Published: March 04, 2024 6:23 PM