कणकवली: आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत. ते मूळ काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेबाबत सांगणे हे हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा एवढा झंझावाती झाला की, थेट त्यांच्या आमदाराला येऊन आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घ्यावी लागली. असा टोला लगावतानाच त्या झंझावाती दौऱ्याचे विश्लेषण करायचे म्हटले तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कोणाचाही विश्वास नाही म्हणून वैभव नाईक आपल्या भवितव्याबाबत काही होऊ शकते का, हे विचारायला आले असतील. पण, रवींद्र चव्हाण यांना भाजप व संघटनेपेक्षा मोठे काही नाही आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. भाजप नेते तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली.त्यावरून जिल्ह्यातिल नागरिकांमध्ये सध्या चर्चा रंगली आहे. त्याबाबत नितेश राणे म्हणाले, वैभव नाईक आपल्या भवितव्याच्या चिंतेमुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटले असतील. संजय राऊत व त्यांच्या मालकाला अचानकच शेतकऱ्यांची चिंता वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम आमच्या भाजप सरकारने केले आहे. जे काँग्रेसला जमले नाही ते भाजप सरकारने केले. शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र, कोकणातल्या शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नाही.कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मनोज जरांगे-पाटील हे समाजाच्या हितासाठी लढत आहेत. फसवणूक होणार नाही. जरांगेनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करावे. जरांगेनी राजकीय वक्तव्य करू नये. आपण समाज बांधव म्हणून एकत्र काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जरांगे बोलल्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी राजकीय वक्तव्य बंद करावे, असेही राणे यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, पण , तेच लोक आता तोंडघशी पडले आहेत. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशीर्वाद होता, मात्र नंतर अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
भवितव्याच्या चिंतेमुळे वैभव नाईक पालकमंत्र्यांना भेटले असावेत, नितेश राणे यांचा टोला
By सुधीर राणे | Published: February 17, 2024 3:22 PM