कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोकांचा जमाव करून घोषणाबाजी देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह प्रत्येकी पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांवर लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होईल असे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुडाळ पोलीस हवालदार संजय कदम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, निवडणूक निकालानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पायी चालत शिवसेना कार्यालयाकडे विजयाच्या घोषणा देत जात होते. यावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना जमवून भाजप पक्ष कार्यालयासमोर घोषणा देत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह संतोष शिरसाट, अतुल बंगे, राजन नाईक, सुशील चिंदरकर यांच्यासह पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांवर भादंवि कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार रूपेश सारंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, निवडणूक निकालानंतर सकाळी ११.३० वाजता शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या कार्यालयाकडे जात होते. भाजप कार्यालयाकडे समोर रस्त्यावर आल्यावर विजयाच्या घोषणा दिल्या.निकालानंतर आपल्या कार्यालयाकडे येऊन थांबलेले भाजप पदाधिकारी विनायक राणे, राकेश नेमळेकर, रामचंद्र परब, आनंद शिरवलकर यांच्यासोबत इतर २५ ते ३० कार्यकर्ते पोस्ट नाका येथे रस्त्यावर जमाव करून आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी विविध कलमांन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागडे यांनी कुडाळ येथे येऊन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी चर्चा केली. कुडाळ शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात सूचना दिल्या. शहरात विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.