वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वैभववाडी शहरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली. शहराच्या अनेक भागात फुटभर पाणी साचल्याचे चित्र होते. दरम्यान, भुईबावडा घाटात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड हटविण्यात आली असून खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे भातपीक संकटात सापडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन तीन दिवसापासुन जोरदार परतीचा पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा जोर घाट परिसरात अधिक होता. त्यामुळे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात दरड कोसळली. गगनबावड्यापासून तीन किलोमीटर अतंरावर कोसळलेल्या या दरडीने रस्त्यांचा बहुतांशी भाग व्यापला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
घाटात कोसळलेली दरड शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून हटविण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता दरड हटविण्यात बांधकाम विभागाला यश आले असून वाहतूक पुर्ववत झाली आहे.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजल्यापासून तालुक्याच्या बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास वैभववाडी शहरात ढगफुटीसदृश्य पावसाला सुरूवात झाली. जवळपास पाऊणतास झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शहरात दाणादाण उडाली.
विजांचा कडकडाट, शहरात साचले फुटभर पाणी
शहराच्या अनेक भागात फुटभर पाणी साचले होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती.जुने बसस्थानक परिसर,संभाजी चौक नजीक परिसर,नवीन बसस्थानक,यासह अन्य काही ठिकाणचा भाग जलमय झाला होता.विजांच्या कडकडाटांसह हा पाऊस सुरू होता. परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे भातपीक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे कापणीलायक झालेल्या भातपिकांच्या कापणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.