सिंधुदुर्ग : तळेरे- गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी च्या करूळ घाटातील ५ किमी भागात दुपदरीकरणाचे काम दिनांक १५ जानेवारी पासून ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. या करुळ घाटात एकेरी वातहूक चालू ठेवणे शक्य नसल्याने या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही व ते धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक २२ जानेवारीपासून ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.
याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण, दरीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरिता दिनांक १५ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र १६६ जी वरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णवेळ पूर्णतः बंद करून उपलब्ध पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली असून या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग१. तळेरे – फोंडा घाट – राधानगरी – ठिकपुर्ली – कळंबा – कोल्हापूर (प्रवासी व अवजड वाहतूक )२. १२३ किलोमीटर. तळेरे – भुईबावडा – गगनबावडा - कळे- कोल्हापूर (प्रवासी वाहतूक ) १०७ किलोमीटर.३. तळेरे – वैभववाडी – उंबर्डे- तळवडे अनुस्कुरा – वाघव- केर्ले- कोल्हापूर (प्रवासी व अवजड वाहतुक) १२८ कि.मी.४. तळेरे – वैभववाडी – अणुस्कुरा – वाघवे – केर्ले – कोल्हापूर (प्रवासी व अवजड वाहतुक) १२९ कि.मी.
दिशादर्शक फलक, संकेत चिन्हे लावण्याचे आदेशकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११६ नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हें लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हा दंडाधिकारी किशोर तावडे यांनी आदेश केले आहेत.