कणकवली : येथील मुडेश्वर मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रणझुंझार वैभववाडी संघाने रवळनाथ ओरोस संघावर एकतर्फी विजय मिळवला आणि बाजारपेठ मित्रमंडळाच्या चषकावर आपले नाव कोरले. संघाला १ लाख ११ हजार १११ रूपये बक्षिसादाखल मिळाले. तर उपविजेत्या रवळनाथ ओरोस संघाला ५० हजार १११ रूपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. रणझुंझार वैभववाडी संघाने सहा षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रवळनाथ संघाचे फलंदाज रणझुंझारच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अवघ्या ३६ धावांत तंबूत परतले. सामनावीर म्हणून रणझुंझारच्या कृष्णा सातपुते याला गौरविण्यात आले. उपांत्य फेरीतील पराभूत रफ अॅण्ड टफ वेंगुर्र्ले आणि अभि मांजरेकर कणकवली या दोन संघांना प्रत्येकी ५१११ रूपये देऊन गौरविण्यात आले. कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झाल्यापासून सहकारी आणि हितचिंंतकांच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धा भरवत आहे. सामाजिक बांधिलकीतून हे काम करत आहे. या स्पर्धांमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, असे बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश पारकर म्हणाले. मालिकावीर म्हणून कृष्णा सातपुते (रणझुंझार वैभववाडी), उत्कृष्ट फलंदाज निखील परब (ओरोस), उत्कृष्ट गोलंदाज संदेश पार्टे (वैभववाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रज्ञेश रटाले (ओरोस), उत्कृष्ट यष्टीरक्षक युवराज (ओरोस) या सर्वांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)विकासासाठीएकत्र या : नारायण राणेसिंधुदुर्गात दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात संदेश पारकर यांचा हात कोणी धरणार नाही. अशा क्रिकेट स्पर्धांमधून राज्य आणि देशपातळीवरील खेळाडू निर्माण व्हायला हवेत. क्रिकेटप्रमाणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी संघटीत झाल्यास विकासाला हातभार लागेल, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. राणे नेहमीच सिनेसृष्टीच्या पाठिशी : सई ताम्हणकरमराठी सिनेसृष्टीला दिशा देण्यासाठी नारायण राणे नेहमीच कलाकारांच्या पाठिशी राहत असल्याचे सांगताना सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी दुनियादारी चित्रपटाच्या निर्मितीसाठी राणे कुटुंबीयांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. स्पर्धेत यशस्वी खेळाडूंनी पुढील काळात सातत्य ठेवावे, असे सई ताम्हणकर यांनी सांगितले.
वैभववाडी रणझुंजार संघाला विजेतेपद
By admin | Published: January 18, 2015 11:23 PM