मालवण : मालवण तालुक्यात जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम संपला. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली. ३० सप्टेंबरपर्यंत २६६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी याच तारखेपर्यंत केवळ १५८९ मिमीच पाऊस पडल्याने केवळ ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. तालुक्यात १८०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ पळसंब येथे वनराई बंधारा बांधून झाला.मालवण तालुक्यात सरासरी दरवर्षी ९०० ते १००० बंधारे उभारले जातात. एवढ्या संख्येने बंधारे उभारल्याने तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या बऱ्यापैकी कमी झाली होती. काही मोजकीच गावे पाणीटंचाईत समाविष्ट करावी लागत होती. यासाठी पंचायत समितीतर्फे विशेष नियोजन करून ग्रामपंचायतीमार्फत हा उपक्रम राबविला जातो. जागोजागी वनराई बंधारे बांधल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मदत झाल्याचे अनेक विहिरीतील पाणी साठ्यावरून स्पष्ट झाले होते. मात्र, यावर्षी पाऊस कमी पडला आहे. २०११ च्या तुलनेत हा पाऊस केवळ ३० टक्केच पडला आहे. २०१४ च्या तुलनेत पावसाची सरासरी ६० टक्के राहिली आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने आताच ओहोळ, नाल्यातील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कृषी विभागाने कंबर कसली २ आॅक्टोबर रोजी झालेल्या सत्कार समारंभावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी मालवण तालुक्याला यावर्षी १८०० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार सभापती सीमा परुळेकर व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातर्फे बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत बंधाऱ्यांची संख्या दुप्पट केल्याने त्याचे नियोजन व बंधारे पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाचा कस लागणार आहे. मालवण तालुक्यातील वनराई बंधारे उभारण्याचा प्रारंभ पळसंब बौद्धवाडी येथे झाला. येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून ओहोळावर वनराई बंधारा बांधला. यावेळी सरपंच दीपिका परब व ग्रामसेविका एस. यू. सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनराई बंधारे दुपटीने वाढणार
By admin | Published: October 09, 2015 11:33 PM