अनिल कासारे - लांजा --टीचभर पोटासाठी माणसाप्रमाणे वन्यप्राणीही आता डोक्याचा वापर करू लागले आहेत. लांजा बसस्थानक परिसरात एक वानर आपली भूक भागवण्यासाठी नामी शक्कल लढवत आहे. या परिसरात मोटारसायकल वाहन उभे करुन कोणी गेला, तर त्याच्या गाडीची चावी हा वानर काढून पळ काढतो. त्यानंतर चावी देण्यासाठी त्याला नाना परीने विनवावे लागते. केळी, पाव, बिस्किटे याचे आमिष दाखविल्यानंतर तो वानर चावी खाली टाकून देतो.परिसरात त्याला खाण्यासाठी काहीच मिळत नसल्याने या वानराने एक नामी शक्कल लढविली. सहा महिन्यांपूर्वी वडाप करणारी एक गाडी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला लावून चालक दुपारचे जेवण करण्यासाठी गेला असता त्या वानराने झाडावरुन उतरुन गाडीची चावी काढून तो पुन्हा झाडावर गेला. वानराने चावी घेऊन गेल्याने गाडीचा चालक चांगलाच अडचणीत आला. वानर झाडावर बसून त्या चावीशी खेळत असल्याचे चालकाने पाहिले व त्याला हटकण्याचा प्रयत्न केला. वानर झाडावरुन सरळ उडी मारुन बसस्थानकात असणाऱ्या लोखंडी कमानीवर जावून बसला. तिथून पुन्हा श्रीकृष्ण हॉटेलच्या छपरावर आल.ावानर चावी घेऊन छपरावर बसून आहे, हे बघताच अनेकांनी बघण्यासाठी गर्दी केली. चालकाने केळी आणून बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीवर ठेवली. केळी पाहताच हातातील चावी टाकून माकड सरळ केळी खाण्यासाठी खाली उतरला. केळी खाल्ल्यावर तो सरळ निघून गेला. दूध डेअरी परिसरात शुक्रवारी मोटारसायकल उभी करुन आयरे नामक व्यक्ती आपल्या गोडावूनमध्ये गेली असता त्यांची चावी काढून फरार झाले. मात्र, त्यांनी त्याचा पाठलाग न केल्याने बिल्डिंगवर टाकून पुन्हा पेट्रोल पंपात निघून गेले. या परिसरात दोन मोठ्या बँका, हॉटेल्स असल्याने मोटारसायकल उभ्या करुन वाहनचालक बँकेत अगर चहा घेण्यासाठी गेले की, वानर येऊन चावी घेऊन जातो. शनिवारी दुपारी २.३० वाजता डेअरीच्या बाजूला मोटारसायकल उभी होती. समोरच मोटारसायकल असल्याने गाडीची चावी काढली नसल्याने वानर गाडीजवळ आला. त्याने मोटारसायकलची चावी काढून शेजारी असणाऱ्या इमारतीवर उडी मारली.इमारतीवरुन उडी मारुन खरेदी-विक्री संघाच्या बिल्डिंगवर वानर गेला. त्याला बिस्कीटचा पुडा दाखविण्यात आला. तो फोडून बांधावरही ठेवण्यात आला. पण, वानर खाली न उतरता बसस्थानकाच्या दिशेने गेला. त्याच्या पाठोपाठ मोटारसायकल चालक गेला. अखेर श्रीकृष्ण हॉटेलकडून शीतल कोल्ड्रिंक्सच्या जवळील झाडावर बसला. त्यावेळी त्याला अर्धा डझन केळी आणून देण्यात आली. केळी पाहिल्यावर दुकानाच्या छप्परावर चावी टाकून केळी घेऊन वानराने काढता पाय घेतला. लांजा बसस्थानक तसेच बाजारपेठ परिसरात हा वानर फिरताना आढळतो. वानराने अनोखी शक्कल लढवत चाव्या चोरण्याचा धंदा सुरू केला असून, त्यामुळे याठिकाणी दुचाकी उभी करणेही त्रासदायक होत आहे.
पोटपूजेसाठी वानराची अनोखी शक्कल
By admin | Published: December 23, 2014 10:05 PM