चिपळूण : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच पावसाचा अनियमितपणा यावर पर्याय म्हणून वाशिष्ठी नदी पात्रात वसंत बंधारा बांधणे गरजेचे आहे. या संदर्भात नगर परिषदेने प्रस्ताव केला असून, गेली ३ वर्ष तो कोकण विभाग पाटबंधारे विभागाच्या लालफितीत अडकून पडला आहे. चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी दि.३१ जुलै २०१३ मध्ये वाशिष्ठी नदीपात्रात कोल्हापूर धर्तीवर वसंत बंधारा बांधण्यात यावा असा प्रस्ताव नगर परिषद प्रशासनासमोर ठेवला होता. या प्रस्तावास मंजुरी ही देण्यात आली आहे. अंदाजपत्रकानुसार खर्च करण्यासाठी नगर परिषदेने हमीपत्रही दिले आहे. फेब्रुवारी, मार्च या महिन्यात शहरात पाणी टंचाई जाणवते या अनुषंगाने वसंत बंधारा हा यावर एक पर्याय ठरु शकतो हा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग यांच्याकडे पाठविण्यात आला असून शासन स्तरावर ही पाठपुरावा सुरु आहे. नगर परिषद पाणी पुरवठा योजनेसाठी वाशिष्ठी नदीतील पाणी उपसा करुन पंप हाऊसद्वारे शहर व परिसराला पाणी पुरवठा करीत आहे. याकरिता वर्षाला अंदाजे ३० लाख रुपये जलसंपदा विभागाकडे जमा होत आहेत. कोयना जलविद्युत केंद्रातून वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी वाशिष्ठी नदीला मिळते. शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेनुसार जॅकवेल येथे वसंत बंधारा बांधण्याची मागणी आहे. त्यामुळे येथे पाणी साठेल व जॅकवेलला मुबलक पाणी मिळेल. तसेच खेर्डी, कळंबस्ते, दळवटणे, धामणंद, खेर्डी एमआयडीसीची जॅकवेल आहे. त्यामुळे त्यांनाही या पाण्याचा उपयोग होवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात होणारी संभाव्य पाणी टंचाई वसंत बंधारा बांधल्यास दूर होण्यास मदत होईल. यासाठी जलसंपदा विभागाने या प्रस्तावास मंजूरी द्यावी अशी मागणी शाह यांनी केली आहे. (वार्ताहर)
वसंतबंधारा ‘लालफितीत’
By admin | Published: September 23, 2015 9:57 PM