कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू असलेल्या या नाट्य चळवळीमुळे राज्यात कणकवलीची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे उदघाटन येथील प्रतिष्ठानच्या रंगमंचावर गुरुवारी रात्री वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी अविष्कार नाट्यसंस्था मुंबईचे दिग्दर्शक विश्वास सोहनी , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित,कार्याध्यक्ष ऍड. एन.आर.देसाई, कार्यवाह शरद सावंत,प्रा.अनिल फराकटे आदि उपस्थित होते.वैशाली राजमाने म्हणाल्या, या उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार होत्या. परंतु त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी उपस्थित राहिले आहे. पण, याचा मला आनंद होत आहे. कारण कणकवलीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्तम सांस्कृतिक काम चालू आहे.
मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण नाटक लोकप्रिय केले. पाच हजारापेक्षा जास्त प्रयोग त्याचे झाले.अशा दिग्गज नाट्यकर्मींच्या स्मृतींही यावर्षीपासून या नाट्य उत्सवातून जपल्या जात आहेत. ही एक चांगली सांस्कृतिक घटना आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा वेगवेगळा स्तर असतो. काही कार्यक्रम 'मास ' साठी तर काही कार्यक्रम 'क्लास' साठी असतात. आचरेकर प्रतिष्ठानचे काम 'क्लास' साठी चालू आहे. दर्दी रसिकांसाठी सुरू असलेल्या या कार्याचे कौतुकच करायला हवे.विश्वास सोहनी म्हणाले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त नाटकासाठी वेचले. त्या अविष्कार संस्थेचे सर्वेसर्वा असणाऱ्या अरुण काकडे यांना हा नाट्य उत्सव समर्पित करण्यात आला आहे. यामुळे मन भरून येत आहे. गेली २८ वर्ष निष्ठेने वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने प्रायोगिक नाट्य उत्सव आयोजित करून या मातीतील ओल जपण्याचे काम केले आहे.
हा उत्सव चिरंतन राहील याबद्दल कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही.कारण चांगले काम हे दिंगतर टिकतच असते.मात्र रसिकानी त्याला साथ द्यायला हवी. वामन पंडित यांनी प्रास्तविक केले . प्रा. अनिल फराकटे यांनी सूत्रसंचालन केले.