ओरोस : घराच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा व पोलीस कोठडीत असल्याचा ठपका ठेवून वेंगुर्ले उभादांडाचे ग्रामसेवक भीमराव घुगे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सेवेतून निलंबित केले . उभादांडा ग्रामपंचायत हद्दीतील महादेव पेडणेकर यांच्या घरबांधणीला वाढीव परवानगी देण्यासाठी ग्रामसेवक भीमराव घुगे यांनी पैशांची मागणी केली होती. याबाबत पेडणेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ठाणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने १५ डिसेंबरला सापळा रचून घुगेला निमुलगा घाटी पठार रस्त्यावर रंगेहात पकडले होते. याप्रकरणी घुगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच लाचलुचपत विभागाचे विशेष न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करीत त्याने जामिनासाठी केलेला जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी उभादांडा ग्रामसेवक घुगे याच्यावर गुन्हा दाखल असल्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला प्राप्त झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घुगे याला याप्रकरणी दोषी ठरवून त्याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी दाखल असलेला गुन्हा व पोलीस कोठडीत असल्याचा ठपका ठेवत त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्वाक्षरी करून घुगे यांना सेवेतून निलंबित केले आहे.(वार्ताहर)
उभादांडा ग्रामसेवक सेवेतून निलंबित
By admin | Published: January 03, 2016 12:31 AM