वैभववाडी: शहीद कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या भारतीय सैन्यात रुजू होणार आहेत. भारतीय सैन्याकडून तशाप्रकारचा दूरध्वनी त्यांना आला असून आॅक्टोबरमध्ये त्या सैन्यात दाखल होणार असल्याची माहीती त्यांचे नातेवाईक विजय रावराणे यांनी दिली.वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. २०११ मध्ये ते लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजु झाले. ७ आॅगस्ट २०१८ रोजी काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. कौस्तुभ शहीद झाले त्याला तिथीनुसार २७ जुलैला वर्ष झाले.
याच दिवशी भारतीय सैन्यदलाकडून वीरपत्नी कनिका रावराणे यांना भारतीय सैन्यात दाखल होण्याचे संकेत दिले गेले आहेत. त्यामुळे रावराणे या आॅक्टोंबर २०१९ मध्ये सैन्यात दाखल होणार आहेत. शहीद कौस्तुभ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सैन्यात दाखल होत असल्याचे नातेवाईकांकडे बोलताना कनिका यांनी स्पष्ट केल्याचे विजय रावराणे यांनी स्पष्ट केले.पती शहीद झाल्यानंतर आपणही सैन्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी आवश्यक ती परीक्षा त्यांनी दिली होती. या परीक्षेत त्या अव्वल आल्याचा दूरध्वनी भारतीय सैन्यदलाकडून कौस्तुभ शहीद झाले त्याला तिथीनुसार २७ जुलैला वर्ष झाले त्याच दिवशी आला. कनिका राणे या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यांनी एमबीएही केले आहे.