वेंगुर्ले : वेंगुर्ले, आरवली, शिरोडा, रेडी, मोचेमाड, वायंगणी आणि निवती या समुद्रकिनारी भागांत मंगळवारी पुन्हा एकदा सकाळी ११.३०च्या सुमारास स्फोटसदृश आवाज झाला. हा आवाज एवढा मोठा होता की, भीतीने शिरोडा परिसरातील घरांतील स्त्रिया घरांच्या बाहेर आल्या, तर काही मच्छिमारांनी आपले ट्रॉलर्स किनारी आणले.दरम्यान, वेंगुर्ले तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नायब तहसीलदार यांनी मच्छिमारांची भेट घेऊन चर्चा केली. या आवाजाने कोणतेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही; पण यामुळे मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (पान १ वरून) वेंगुर्ले समुद्रकिनारी स्फोटसदृश आवाज होण्यामागचे प्रमाण वाढले असून, मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास वेंगुर्ले, आरवली, शिरोडा, मोचेमाड, रेडी, वायंगणी व निवती या समुद्रकिनारी भागांत तीनवेळा स्फोटसदृश आवाज झाला. शेवटचा आवाज मोठा झाल्याने येथील नागरिकांमध्ये व मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.प्रशासनाबाबत संतापसमुद्रातील होणाऱ्या स्फोटसदृश आवाजाची ही तिसरी वेळ आहे. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे मच्छिमारांसह समुद्रकिनाऱ्यावरील रहिवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त होत आहेअधिकाऱ्यांकडून पाहणीमंगळवारी झालेल्या आवाजानंतर वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार सुरेश नाईक, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक रतनसिंग रजपूत, निवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जानकर यांनी वायंगणी व निवती किनारी भेट घेऊन किनारपट्टीची पाहणी करून तेथील मच्छिमारांशी चर्चा केली. या चर्चेअंती काहीच ठोस माहिती मिळाली नसल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र यावर काहीही बोलणे यावेळी सर्वांनी टाळले. पालकमंत्र्यांनी बोलाविली मुंबईत बैठकवेंगुर्ले, आरवली, शिरोडा, रेडी, मोचेमाड, वायंगणी आणि निवती या समुद्रकिनारी भागात मंगळवारी स्फोटसदृश आवाज झाल्याने मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार असून आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.भूकंप नाही; आवाजाचा शोध सुरू : खुटवड सिंधुदुर्गनगरी : यापूर्वी वेंगुर्ले समुद्रात झालेला स्फोटसदृश आवाज हा भूकंपामुळे झाला नसल्याचा निर्वाळा कोयना भूकंपमापक केंद्राने दिला. आजही स्फोटसदृश गूढ आवाज आला. प्रशासनामार्फत या आवाजांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय सागरी विज्ञान केंद्र, गोवा व नेव्ही यांची मदत घेऊन या स्फोटसदृश आवाजाचा छडा लावणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. / वृत्त १०
वेंगुर्ले समुद्रात स्फोटसदृश आवाज
By admin | Published: April 27, 2016 12:17 AM