वेंगुर्ले : मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोंद्याच्या दिशेने पळ काढणाऱ्या कारचालकाचा वेंगुर्ले पोलीस पथकाने पाठलाग केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारात मातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार झाला. या कारवाईत वेंगुर्ले पोलिसांनी सुमारे १ लाख ८४ हजार ३२० रुपयांच्या दारूसह कार ताब्यात घेतली. वेंगुर्ले पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अभिजित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल धुरी, अजय नाईक, वाहतूक पोलीस दत्तात्रय पाटील या पथकाने रविवारी रात्री मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर नाकाबंदी करुन मातोंड-घोडेमुख येथे वाहन तपासणी सुरू केली. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोनेरी रंगाची कार आली. मात्र, पोलिसांची नाकाबंदी पाहून चालकाने लगेच कार वळवून आरोंद्याच्या दिशेने भरधाव सोडली. या कारचा तत्काळ पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या पथकाने पाठलाग केला.
रात्री १ वाजण्याच्या सुमारास मातोंड-सातवायंगणी येथे ही कार दरवाजा उघडा टाकलेल्या स्थितीत आढळली. चालकाने मात्र पलायन केले होते. या कारवाईत सुमारे १ लाख ८४ हजार ३२० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू व कारसह एकूण ७ लाख ८४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.