प्रथमेश गुरव- वेंगुर्ले -बदलत्या काळातही उन्हाळा किंवा पावसाळ्यात संरक्षणासाठी आवश्यक असलेली नारळाच्या झाडांची झापे आपले अस्तित्व टिकवून आहेत. ग्रामीण भागात विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या झापांना पावसाळ्याच्या तोंडावर मागणी वाढली आहे. त्यामुळे वेंगुर्लेत ठिकठिकाणी अशाप्रकारची झापे बनविली जात असून, लोकांनी अन्य रोजगारांबरोबरच झापांचा व्यवसाय जोडधंदा म्हणून स्वीकारला आहे. नारळाचे झाड तसे बरेच उद्योग मिळवून देते. काथ्या उद्योगाला तर नारळाची सोडणे आवश्यक आहेत. त्या सोडणांपासून पायपुसणी, दोरखंड तसेच शोभेच्या वस्तूही बनविल्या जातात. वेंगुर्ले शहरातील काथ्या व्यवसायामुळे तर शेकडो जणांना रोजीरोटीचे साधन मिळाले आहे. काथ्यापासून बनविल्या जाणाऱ्या वस्तूंना मागणी असल्याने काथ्या व्यवसाय रोजगाराचे साधन बनले. हिरव्यागार झापांचे हीर काढून त्याची केरसुणी बनविण्याचाही व्यवसाय पंचक्रोशीत जोरदार सुरू आहे. अशा केरसुणी बनविण्यासाठी काही सहकारी संस्था अर्थपुरवठाही करत आहेत. नारळाच्या झाडांपासून मिळणारी झापे इतरत्र फुकट न घालवता ती व्यवस्थित वळून त्यांचा घरांच्या छपरासाठी उपयोग करणे ही गोष्ट फार पूर्वीपासून प्रचलित असून, त्याकाळी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. लग्नसमारंभ, उन्हाळ्यातील घरासमोरील मंडपासाठी अशी झापे आवर्जून वापरली जायची. कालांतराने काळानुरूप बदल होऊन घरांची छपरे मंगलोरी कौलांची झाली. लग्नमंडपातही कापडी मंडप दिसू लागले आणि अशी झापे दिसणे कमी झाले. इतर प्रसंगी जरी झापांची गरज नसली, तरी पावसाळ्यात मात्र झापांना फार मागणी आहे. सर्वसामान्य लोक वाऱ्याबरोबर पावसाचे पाणी घरात येऊ नये, यासाठी अशा झापांची झडी बांधतात. कडक उन्हातही या झापांपासून गारवा मिळत असल्याने लोकांनी याला पसंती दर्शवली आहे. मच्छिमार लोकही पावसापासून ट्रॉलर्स, होड्या आदींचे संरक्षण होण्याकरिता अशा झापांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे बदलत्या काळातही नारळाच्या झाडांच्या झापांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. महिलांसाठी ‘पार्ट टाईम’ व्यवसायया व्यवसायाकडे महिला वर्गाचा कल जास्त दिसून येत आहे. स्वत:ची नारळाची झाडे नसल्यास इतरांकडून अल्प मोबदल्यात ही झापे घेऊन ती विक्रीस ठेवत आहेत. सकाळच्यावेळी घरातील कामे, दुपारनंतर झापे वळून दुसऱ्या दिवशी ती विक्रीसाठी बाजारात नेणे, असा सहजसोपा व्यवसाय आहे. त्यामुळे महिलावर्गासाठी हा ‘पार्ट टाईम’ व्यवसाय ठरत आहे.व्यवसाय टिकविणे आवश्यकएका झापाची किंमत त्याच्या आकारानुसार ठरविली जाते. लहान असल्यास १५ रुपये, तर मोठे झाप असल्यास २० रुपये दराने एक अशी विकली जात आहेत. झापे वळण्याची कला वेगळीच आहे. झापे वळणे हे सर्वांनाच साध्य होत नसल्याने काही मोजक्याच महिला हा व्यवसाय करीत आहेत. ज्या घरात पूर्वापार हा व्यवसाय सुरू आहे, त्या घरातील नवीन पिढीही यात सहभागी होत आहे, हे विशेष. नारळाच्या झाडांपासून मिळणाऱ्या या झापांचा व्यवसाय भविष्यकाळात टिकविणे हे सर्वांच्या हाती आहे.
वेंगुर्लेत झापे अजूनही अस्तित्व टिकवून
By admin | Published: May 20, 2015 9:55 PM