वेंगुर्ले : कोकणच्या विकासासाठी भाजपा सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून सकारात्मक पावले उचलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव वेंगुर्ले भाजपातर्फे मासिक बैठकीत घेण्यात आला.कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. पडीक जमिनीवर आंबा, काजू लागवड करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली. समुद्रकिनारा संवर्धनासाठी खार बंधाऱ्यांसाठी ६० कोटींची तरतूद केली असून समुद्र किनारा संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प राबविण्यासाठी शासन विचाराधीन आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद, वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रतील पाण्याखालचे सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील पहिली बॅटरी आॅपरेटेड पाणबुडी उपलब्ध होणार असून, पाणबुडीद्वारे होणाऱ्या समुद्र पर्यटनामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित होऊन पर्यटनातून रोजगार निर्मिती होण्याबाबत तरतूद केली आहे.देवेंद्र फडणवीस सरकारने कोकणाच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करून कोकणाला झुकते माप दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पक्षाचे संपर्कमंत्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव तालुक्याच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १0 कोटीछत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले-उभादांडा येथील स्मारक, मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक सिंधुदुर्गात होण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली.