प्रथमेश गुरव -- वेंगुर्ले --पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने व शासनाने मासेमारी बंदी लागू केल्याने समुद्रकिनारी आता ट्रॉलर्स विसावले आहेत. सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहील. मात्र, पावसात दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील मासेमारी सुरु असेल. जून, जुलै या महिन्यात मत्स्यबीज निर्मिती होते. पाऊस व वादळी हवामानामुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने शासन या कालावधीत मासेमारी बंदीचा आदेश देतात. त्यानुसार यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे. त्यामुळे मासेमारी बंदीला मंगळवारपासूनच सुरुवात झाली आहे. यामुळे पावसाच्या पाण्याने भिजून ट्रॉलर्सचे नुकसान होऊ नये यासाठी माडाची झापे व प्लास्टिकच्या सहाय्याने टॉलर्स किना-यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले जात आहेत. मासेमारी बंदमुळे मच्छिमारांना अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांना हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पर्यायी रोजगार नसल्याने या कालावधीत मागील मिळविलेल्या उत्पन्नावरच गुजराण करावी लागणार आहे. परंतु काही मच्छिमार दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील पारंपरीक मासेमारी सुरु करतात. त्यातून गरजेपुरते मासे ठेऊन माशांची विक्री करतात. त्यामुळे बंदी कालावधीत दृष्टीआड होणारे मासे या खाडीतील मासेमारीमुळे लोकांना मिळतात. परिणामी, मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात नसला तरी गरजेपुरता रोजगार मिळतो. मासेमारी बंद झाल्यानंतर मच्छिमार मिळालेल्या रिकाम्या वेळेचा दुरुपयोग न करता जुन्या होड्यांची डागडुजी, गरज असल्यास नविन होड्यांची बांधणी, जाळयांचे विणकाम अशाप्रकारे भविष्यकाळासाठी लागणा-या साधनांची निर्मिती व दुरुस्तीच्या कामात मग्न होतात. निवास, न्याहारीसाठी प्रयत्न आवश्यकशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकल्प राबविले गेले. वेंगुर्ल्यात स्वच्छ किनारपट्टी, चांगली हवा असल्याने याठिकाणीही पर्यटक येतात. परंतु निवास न्याहारीची सोय नसल्याने इथे वस्ती न करता अन्य ठिकाणी जातात. जर शासनाने मच्छिमारांच्या बोटिंग लायसन्स, निवास न्याहारीबाबत लागणाऱ्या प्रक्रियेत काही प्रमाणात सवलत दिल्यास येथील मच्छिमारीही निवास न्याहारीमार्फत आपला पर्यायी व्यवसाय निवडू शकतात.हा हंगाम ठरला अनेक अडचणींचायावर्षी पर्सनेट, समुद्रातील स्फोटसदृश आवाज यामुळे किनारपट्टी हादरुन गेली होती. परिणामी, या परिस्थितीमुळे मासेमारी कमी झाली. मासेमारीसाठी लागणारे जाळे, डिझेल, रॉकेल, बोटीची डागडुजी, खलाशांची मजुरी आदी खर्च वगळता यावर्षी झालेल्या एकूण मासेमारी व्यवसायातून वर्षभराची गुजराण करणे अवघड होणार आहे.
वेंगुर्लेच्या बोटी बंदरात विसावल्या
By admin | Published: May 31, 2016 10:49 PM