वेंगुर्ले : तालुका स्कूल वेंगुर्ले शाळा नं.-१ मध्ये गुरुवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेत शाळेत प्रवेश करणाऱ्या शिक्षकाला शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी प्रवेशद्वारावरच पकडून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर केले. प्रमोदकुमार केशवराव टेकाळे असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. दरम्यान, या शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.वेंगुर्ले येथील तालुका स्कूल शाळा नं.-१ मध्ये दोन शिक्षकाची पदे रिक्त असल्याने रेडी-कनयाळ येथील प्रमोदकुमार केशवराव टेकाळे यांची तात्पुरती नेमणूक केली होेती. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर ते काही दिवस रजेवरच होते. गुरुवारी प्रमोदकुमार हे सकाळी मद्यधुंद अवस्थेत शाळेत प्रवेश करीत असताना येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना पकडले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले; पण शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने वातावरण निवळले. (प्रतिनिधी)शिक्षकावर कडक कारवाई करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टेकाळेला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर केले. कार्यालयातील अधिकाऱ्यांना याप्रकाराची प्रचिती येताच त्यांनी टेकाळेवर कडक कारवाईची हमी दिली; पण कोणती कारवाई करणार, याबाबत मात्र काहीच सांगितले नाही. परिणामी, ग्रामस्थ व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्तकेली. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे शेवटी हे प्रकरण शांत झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शंकर कोरगावकर, श्रीनिवास सौदागर, वैशाली वैद्य यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
वेंगुर्लेत मद्यधुंद शिक्षकाला पकडले
By admin | Published: July 29, 2016 12:18 AM