वेंगुर्ले , दि. १८ : शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तिक जीवनात असलेले स्वच्छतेचे महत्त्व, शारीरिक स्वच्छता कशी राखावी त्याचबरोबर परिसर स्वच्छतेचे महत्त्व याबाबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांनी मार्गदर्शन करत मुलांमध्ये स्वच्छताविषयक जागृती निर्माण केली. तसेच प्रत्येक शाळेत हँड वॉश कीट देऊन नियमित चांगल्या सवयी अवलंबण्याचा संदेश दिला.
निरोगी जीवनासाठी वैयक्तिक शरीर स्वछता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच उद्देशाने शारीरिक स्वच्छतेचा एक घटक म्हणून जागतिक आरोग्य संस्था डब्लूएचओ तर्फे १५ आॅक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य संपन्नतेसाठी दैनंदिन जीवनात शारीरिक स्वच्छतेची जाणीव जागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसच्यावतीने जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून गावातील जिल्हा परिषद केंद्र्रशाळा जैतीर विद्यालय तुळस, वेताळ विद्यामंदिर, सरस्वती विद्यालय, जयहिंद विद्यालय, दत्त विद्यालय, गोवर्धन विद्यालय, शारदा विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, गिरोबा विद्यालय अशा सर्व प्राथमिक शाळांमध्ये जाऊन हँड वॉश कीट देण्यात आले. तसेच नियमित चांगल्या सवयी अवलंबण्याचा संदेश दिला.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते महेश राऊळ, नाना राऊळ, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, गुरुदास तिरोडकर, माधव तुळसकर, सचिन गावडे, भूषण राऊळ, वैभव होडावडेकर, प्रणिता परब आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या कार्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने प्राथमिक शाळांना हँड वॉश कीट देण्यात आले. यावेळी प्रा. सचिन परुळकर व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.(सावळाराम भराडकर)