ओरोस : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ४५० प्राथमिक शिक्षकांनी ती विहीत मुदतीत सादर करावीत, अन्यथा त्यांची सेवा समाप्त केली जाणार असल्याच्या नोटिसा प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही प्रमाणपत्रे वा प्रमाणपत्रासाठी अर्ज समितीकडे सादर केल्याचा पुरावा सादर करण्यासाठी संबंधित शिक्षकांना दिलेल्या मुदतीत वाढ करावी व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांच्याकडेकेली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी काही मागास प्रवर्गातील शिक्षकांच्या नियुक्त्या खुल्या प्रवर्गातून झाल्या होत्या. त्यामुळे या शिक्षकांना जात पडताळणी करून घेण्याची आवश्यकता लागली नाहीे. मात्र, त्यानंतर शासनाने बिंदूनामावलीप्रमाणे सर्वांनी ही जात पडताळणी करून घ्यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षक विभागाने या शिक्षकांनाही जात पडताळणी करून न घेतल्याने या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आता नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याविषयी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म. ल. देसाई यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दत्ता सावंत, शंकर बागवे, लक्ष्मण दळवी, संतोष मराठे, राजा कविटकर, शंकर गोसावी, आदी पधाधिकारी यावेळी उपस्थित होते. ठाकर समाजाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रवर्गातील शिक्षक जातपडताळणी करून घेऊ शकत नाहीत. काही शिक्षकांकडे पुराव्याची कमतरता असून, ते पुरावे शोधण्यासाठी त्यांना विलंब होत आहे. त्यामुळे ही जात पडताळणी करून घेण्यासाठी या शिक्षकांना मदत मिळावी, अशी मागणी या संघटनेने शिक्षण अधिकारी रत्नाकर धाकोरकर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)
४५0 शिक्षकांना जात पडताळणी नोटिसा
By admin | Published: March 18, 2016 9:13 PM