सावंतवाडी : बहुचर्चित अशा वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल सभापती प्रमोद सावंत यांनी खुला केला. यामध्ये तीन लाख १५ हजारांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुढे आले असून, चौकशी समितीने पाचजणांवर ठपका ठेवला आहे. यामध्ये वेर्ले सरपंच प्रमिला मेस्त्री, ग्रामसेवक केतन जाधव यांच्यासह पर्यवेक्षक गटसंसाधन केंद्राच्या वैशाली खानोलकर, अस्मिता बांदेकर, अविनाश सावंत, आदींचा समोवश आहे. गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी हा अहवाल तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्याकडे पाठविला आहे.वेर्ले येथे शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना सदस्य राघोजी सावंत यांनी केला होता. त्यानंतर सभापती प्रमोद सावंत यांनी गटविकास अधिकारी मोहन भोई यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कृषी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला होता.या अहवालात समितीने तीन लाख १५ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. यात वैयक्तिक लाभार्थी १३२ होते. त्यांना १३ लाख ७७ हजारांचे वाटप करण्यात आले. त्यातील १०२ लाभार्थ्यांना १२ हजारप्रमाणे १२ लाख २४ हजार रुपये, तर ग्रामपंचायतने ११७ लाभार्थ्यांना १० लाख ६१ हजार रुपये अदा केले आहेत. मात्र, त्यातील ४६ लाभार्थ्यांना नियमबाह्य अनुदान दिले आहे. (पान १ वरून) ही यादी स्वच्छ भारत संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे. या ४६ लाभार्थ्यांना चार लाख ४० हजार रुपये दिले. मात्र, ते कुठेच दिसत नाहीत. असा निष्कर्ष समितीने काढला असून, त्यातील तीन लाख १५ हजार रुपयांची नोंद कॅशबुकमध्येही नाही, असेही या समितीने म्हटले आहे. या समितीच्या निष्कर्षानुसार नियमबाह्य यादी तयार करण्यात आल्याने समितीने वेर्ले सरपंच प्रमिला मेस्त्री व ग्रामसेवक केतन जाधव यांना थेट दोषी धरले आहे. त्यांनी ही यादी तयार केली. यादी तयार करीत असताना त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला का, याचा कोणताही अभ्यास केला नसल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच स्वच्छ भारत समितीच्या गटसंसाधन केंद्राच्या पर्यवेक्षक म्हणून वैशाली खानोलकर, अस्मिता बांदेकर, अंकिता सावंत या असून, यातील खानोलकर यांच्याकडे वेर्लेचा भाग येत असल्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यामुळे या तिघींवरही सरपंच, ग्रामसेवकांप्रमाणेच ठपका ठेवण्यात आला आहे. हे पाचही जण प्रामुख्याने दोषी आढळल्याचे सभापती सावंत यांनी सांगितले. या पाचजणांच्या कारवाईबाबत अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह घेणार आहेत. त्यांच्याकडे हा अहवाल गटविकास अधिकाऱ्याने पाठवून दिल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गटविकास अधिकाऱ्यांवर संशयवेर्ले येथे शौचालयात भ्रष्टाचार झाला. त्याची कागदपत्रे विस्तार अधिकारी एच. डी. यरलकर यांच्या सहीने पुढे सरकली. मात्र, त्याचा धनादेश गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी काढला आहे. हा धनादेश पूर्ण तालुक्याचा काढला असे भोई सांगत असले, तरी धनादेश काढत असताना खात्री का करण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत असून, संशयाची सुई गटविकास अधिकाऱ्यांकडेही जात आहे.
वेर्ले शौचालय घोटाळा; पाचजणांवर ठपका
By admin | Published: November 30, 2015 11:37 PM