सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायत यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ताब्यात होती. त्यामुळे आता ३७ मतांनी मिळविलेल्या विजयाने राणेंचे कोणतेही राजकीय वजन वाढणार नाही. ते पूर्वी महाराष्ट्राचे नेते होते, आता ते सिंधुदुर्गापुरते मर्यादित आहेत, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी लगावला. मैत्रीपूर्ण लढतीमुळेच मतांचे विभाजन झाले. त्याचा फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली.पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना-भाजपा युती करण्याचे मान्य झाले होते. पण आयत्यावेळी चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्यात आल्या हे योग्य नाही. जर युती करायची होती तर युतीच करायची. वैभववाडी येथे मैत्रीपूर्ण युती केल्याने पराभव झाला हे मोठे उदाहरण समोर असतानाही कणकवलीत त्याचा धडा घेतला नाही. त्यामुळेच मतांचे विभाजन झाले आणि त्यातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना अवघी ३७ मते कमी पडली. विजय हा विजय असतो, पण कणकवली राखली यात नवल काही नाही.
३७ मतांनी मिळवलेल्या विजयाने राणेंचे वजन वाढणार नाही- केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:00 AM