खारेपाटण : कोकणवासीयांचा अतिशय महत्त्वाचा असलेला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कोरोनाचे राज्यातील व देशातील संकट काही केल्या संपत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, कोकणातील गणेशभक्त हे आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवास मोठ्या संख्येने गावी येणार आहेत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची व माणसांची गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण तपासणी नाक्याला भेट देऊन येथील सुरक्षा यंत्रणा तसेच महसूल नोंदणी कक्षाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत कणकवली तालुका पोलीस निरीक्षक शिवाजी कोळीदेखील उपस्थित होते.खारेपाटण तपासणी नाका गेले ४ महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र व देशभर चर्चेत आहे. येथील तपासणी नाक्यावर मुंबई तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या खासगी वाहनांच्या सुमारे ४ किलोमीटरपर्यंत तासन्तास रांगा उभ्या राहिल्या होत्या. यामुळे पोलीस, महसूल यंत्रणा व स्थानिक प्रशासनावर मोठा ताण पडला होता.गणेशोत्सवाला कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येणार असल्याने खारेपाटण तपासणी नाक्यावर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटणला भेट दिली.यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण तळेरे मंडळ अधिकारी मंगेश यादव, खारेपाटण तलाठी रमाकांत डगरे, खारेपाटण तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक बांगर, पोलीस ठाण्याचे अनमोल रावराणे, उद्धव साबळे आदी उपस्थित होते.तहसीलदार आर. जे. पवार यांनी यावेळी तपासणी नाक्याची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांची चर्चा केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्यावर मंडप बांधण्यात येणार असून आरोग्य व महसूल यंत्रणेचे जादा पथक याठिकाणी कार्यरत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणी नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.