सिंधुदुर्ग : ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले होते. मात्र, ही प्रयोगशाळा सुरू झाली नव्हती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातल्यानंतर १ जूनपासून ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदारांना आता टेस्टींगसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत ठेकेदारांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ओरोस येथील शासकीय विश्रामृह परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होती. मात्र, अधिकारी व काही तांत्रिक बाबीमुळे या लॅबचे काम सुरू होऊ शकले नव्हते. अजयकुमार सर्वगोड यांचा पाठपुरावा सिंधुदुर्गमधील ठेकेदारांना कामाच्या टेस्टींगबाबत रत्नागिरीला जावे लागत असल्याने ही लॅब सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार लॅबचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने या लॅबचे काम सुरू झाले आहे. येथे उपअभियंता सय्यद व चौधरी हे कामकाज पाहणार असून आता ठेकेदारांचा रत्नागिरीला जाण्याचा त्रास वाचणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ओरोस येथे दक्षता, गुणनियंत्रण प्रयोगशाळा सुरू, ठेकेदारांचा रत्नागिरीला जाण्याचा त्रास वाचणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 01, 2023 3:39 PM