निकेत पावसकर सिंधुदुर्ग : कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील कठीण परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
सिने अभिनेते विजय पाटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्तांगण परिवार फाऊंडेशनच्या वतीने वाघोली, तालुका हवेली, येथील माहेर संस्थेच्या 250 मुलांना जेवणाचे डब्बे वाटण्यात आले.तसेच वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा येथील गरजूंना मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मुक्तांगण परिवार फौंडेशन या संस्थेचे अध्यक्ष नारायण कांबळे यांनी दिली.याप्रसंगी गौरव सावंत, संतोष चौंधे, महेश कर्चे, शिवाजी मासाळकर, राजेंद्र आगरवाल, प्रकाश पट्टेदार, फोटो ग्राफर शुभम यादव, माहेर संस्थेच्या वर्षा भुजबळ, सुकेशनी, सोनवणे, लोणकर, खोब्रागडे, निकिता सोनवणे, यांच्या उपस्थितीत मुलांना खाऊचे डब्बे देण्यात आले. माहेर संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांनी सिने अभिनेते विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मुक्तांगण परिवार फौंडेशनचे आभार मानले.