देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने २९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी गाव आपलो, सन्मान सर्वांचो या ब्रीदवाक्याची घोषणा करण्यात आली आहे.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विजयदुर्ग एसटी आगार ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत लेझिम पथकासह मिरवणूक, १० वाजता विजयदुर्ग किल्ला येथे सर्वधर्मीय प्रार्थना, १०.३० वाजता विजयदुर्ग किल्ला ते पोर्ट ट्रस्ट आॅफिस स्टेजपर्यंत मिरवणूक, ११ वाजता विजयदुर्ग महोत्सवाचे उद्घाटन, दुपारी ३ वाजता इतिहासतज्ज्ञ अमर आडके यांच्यासोबत विजयदुर्ग किल्ले दर्शन, सायंकाळी ५ वाजता सेंद्रिय शेतीसंदर्भात मार्गदर्शन, ६ वाजता जुन्या-नव्या गाण्यांचा सूरसंगम कार्यक्रम, रात्री ८ वाजता विद्यार्थ्यांचे डान्स, रात्री १० वाजता मालवणी काव्यवाचन व मालवणी कॉमेडी.
३० रोजी सकाळी ९ वाजता विजयदुर्ग चौपाटी येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय किल्लेबांधणी स्पर्धा, ९ वाजता जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, ५ वाजता महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम, ६ वाजता स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता सूरसंगम कार्यक्रम, १० वाजता कलंदर ग्रुप आयोजित धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केला असून तो रविकांत राणे सादर करणार आहेत.३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्लो सायकलिंंग स्पर्धा, १० वाजता तालुकास्तरीय नौकानयन स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता कोल्हापुरी मर्दानी खेळ, ७ वाजता ऐतिहासिक शाहीर पोवाडा गायन, रात्री ९ वाजता विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार व त्यानंतर आॅर्केस्ट्रा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नितीन जावकर व विजयदुर्ग अध्यक्ष डॉ. यश वेलणकर यांनी केले आहे.