देवगड (सिंधुदुर्ग): देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने १ जानेवारी रोजी ऐतिहासिक किल्ले विजयदुर्ग दीपोत्सवाने उजळणार आहे. सुमारे ५० मशाली आणि पाच हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे घराण्याचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे (कुलाबा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २८ डिसेंबर रोजी किल्ले विजयदुर्गवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.१ जानेवारीला दुपारी ३:३० वाजता विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये या तिन्ही ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ यांच्यासह सडेवाघोटण, नाडण, पडेल, मोंड, वाडा, वाघोटण, सौंदाळे, मणचे, फणसे, पडवणे, फणसगाव, तिर्लोट येथील शिवप्रेमी मिळून सुमारे ५० मशाली आणि पाच हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह ढोल-ताशांच्या गजरात, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपत मिरवणुकीत सहभागी होऊन दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी छत्रपती शिवरायांसह स्वराज्याच्या मावळ्यांना मानवंदना दिली जाणार आहे.मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेदीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन युद्धकलेची आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दिल्लीत सादरीकरण झालेले सव्यसाचि गुरुकुलम् (कोल्हापूर) यांची मर्दानी प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. शिवकालीन शिडाच्या बोटी दीपोत्सवादिवशी विजयदुर्गाला येऊन छत्रपती शिवराय, मावळे आणि सैनिकांना मानवंदना देत शिवकालीन आरमाराचे स्वरूप दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंडळाकडून देण्यात आली.
Sindhudurg: नववर्ष स्वागताला ‘विजयदुर्ग किल्ला’ दीपोत्सवाने उजळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:43 PM