कुडाळ : जोपर्यंत येथील जमीनदारांना नोटिसा बजावल्या जात नाहीत तसेच जमीन मोजणी प्रक्रियेसंदर्भात सर्व खरी माहिती प्रशासन प्रकल्पग्रस्तांना देत नाही, तोपर्यंत या ठिकाणचा चौपदरी करणासाठी महामार्गाला लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीसाठी अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर जमीनदार व शेतकऱ्यांनी झाराप येथे घेऊन मोजणीचे काम बंद पाडले. त्यामुळे मोजणी न करताच अधिकारी मागे फिरले. शासनाने मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने हाती घेतले असून यासाठी लागणारी जमीन मोजणीचेही काम संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील कसाल ते झाराप या पट्ट्यातील वीस गावातील महामार्गासाठी जमीन मोजण्याचे काम ५ मेपासून झाराप येथून सुरू होणार होते. याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता योगिता वळवी, भूकरमापक शेख हमीद मुशा, पिंगुळी मंडळ अधिकारी व झारापचे तलाठी यांनी झाराप येथील महामार्गावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोजणीस सुरुवात केली. मोजणीस प्रारंभ होणार असल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे तुकाराम मांजरेकर, अशोक रामदास, दिलीप तेंडोलकर, अमित रेडकर, रुपेश कानडे, अनिल गावकर, बंड्या मांजरेकर, सुभाष मांजरेकर, तसेच अन्य १५० ग्रामस्थांनी या मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना घेरले व जोपर्यंत आम्हाला योग्य माहिती मिळत नाही व नोटिसा मिळत नाहीत, तोपर्यंत मोजणी करण्यास देणार नाही, असा पवित्रा घेतला व मोजणीचे काम बंद पाडले आहे. (प्रतिनिधी)
झाराप येथील जमीन मोजणीचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
By admin | Published: May 05, 2015 10:23 PM