देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एन. आगाशे यांच्या हलगर्जीपणामुळे संदीप कावले यांचा नाहक बळी गेल्याने संतप्त देवगड जामसंडेवासीयांनी देवगड ग्रामीण रूग्णालयाला घेराव घालून देवगड जामसंडे रस्ता सुमारे २ ते ३ तास रोखून ठेवला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक होऊन आरोग्य मंत्री दीपक सावंत व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत असल्याने वातावरण तंग झाले होते. तसेच ग्रामीण रूग्णालयामध्ये ग्रामस्थांनी घुसून डॉक्टरांशी मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळण्यासाठी हुज्जत घातली. यामुळे देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ओरोस येथून पोलीस दलाची राखीव फौज मागविण्यात आली होती. देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगाशे यांनी कावलेवाडी येथील संदीप कावले याला शरीरदुखीचे इंजेक्शन दिल्याने इंजेक्शनचे रिअॅक्शन होऊन कावले यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना समजताच कावले हे रिक्षा व्यवसायिक असल्याने तालुक्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व देवगड जामसंडे कावलेवाडी येथील ग्रामस्थांनी तत्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मृताच्या नातेवाईकांना तत्काळ नोकरी, हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरवरती तत्काळ कारवाई तसेच नुकसानभरपाई असा प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या. मात्र, सात तास उलटूनदेखील जिल्हा शल्य चिकित्सक देवगड ग्रामीण रूग्णालयात हजर न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन रूग्णालयाला ठाळे ठोकले. त्यानंतर ग्रामस्थांचा मोर्चा देवगड जामसंडे प्रमुख रस्त्याकडे वळून सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी करत रूग्णालयाचा परिसर दुमदुमून सोडला होता. अखेर ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक देवगडमध्ये दाखल होताच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन त्यांना घेराव घालून जाब विचारला. तसेच देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये नारायण हरी वागट (४२, रा. मिठमुंबरी) व गुणाबाई बाजीराव जाधव (६९, रा.तळेबाजार) यांनाही उपचार करतेवेळी डॉ. आगाशे यांनी तसेच इंजेक्शन दिले गेल्यामुळे रिअॅक्शन हॉऊन त्यांचीही प्रकृती अस्वस्थ झाली होती. त्यांना देवगड खासगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच मृत कावले यांच्या पत्नीला जिल्ह्यामधील आरोग्य विभागामध्ये रिक्त जागांची नोकर भरती जाहीर झाल्यानंतर विशेष बाब म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिलोलीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ग्रामस्थांमध्ये झटापटी : पोलीस छावणीचे स्वरूप ४उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा मुख्यालयामधून पोलीस फौजफाटा तसेच विजयदुर्ग व आचरा पोलीस ठाण्यामधून पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यावेळी देवगड पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, विजयदुर्ग पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, महिला उपपोलीस निरीक्षक एम. आर. पाटे, एम. एम. भालेकर, चंद्रकांत लाड, राजन पाटील, सुरेश पाटील, एस. एस. भागवत आदी पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ४दरम्यान, संतप्त आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीदम आले होते. यामुळे काहीवेळा पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटीच्या घटना घडल्या.
देवगड रूग्णालयाला ग्रामस्थांनी घेरले
By admin | Published: December 26, 2015 11:54 PM