ओरोस : भटक्या व विमुक्त जातीतील समाजामध्ये शिक्षण प्रसार व्हावा आणि त्यांना शासनाच्या २१८ योजनांचा लाभ मिळावा यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील २७ वर्षीय संजय मारुती कदम यांनी ७ जून २०१७ रोजी विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान सुरू केले आहे. देशातील २२ राज्ये फिरून राज्यातील २७ जिल्हे फिरून झाल्यावर २६ जानेवारी रोजी त्यांचे आगमन सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. सध्या जिल्ह्यातील भटक्या जाती विमुक्त जमाती वस्तीत जाऊन हा युवक याबाबत जनजागृती करीत आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य महान व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याचप्रमाणे पूर्ण जीवन वाहिले. स्वातंत्र्यानंतर देशात समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची कमी नाही. कारण हा देश विविध जाती, जमाती यांनी व्यापलेला आहे. समाजाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, अशी भावना मनात बाळगून अनेक लोकांनी आपल्या समाज विकासासाठी पूर्ण आयुष्य झिजविले आहे. याच हेतूने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘शिका, मोठे व्हा, संघर्ष करा’ ही शिकवण घेऊन संजय कदम यांनी ७ जून २०१७ रोजी भटक्या जाती, विमुक्त जमाती जोडो अभियान सुरू केले आहे. आपला जन्म मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला झाला. ती परिस्थिती अन्य कोणावर येऊ नये हाच प्रमुख उद्देश असल्याचे संजय कदम यांनी सांगितले.मूळ गोंधळी समाजातील असलेल्या संजय कदम यांनी पुणे येथून सुरू केलेले हे अभियान सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील २७ जिल्ह्यांत राबविले. त्या त्या जिल्ह्यातील गरजेनुसार शाळा सुरू करणे, अन्नदान केले, त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगितल्या. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रबोधन केले. त्यानंतर संजय कदम यांनी विविध राज्यांत भ्रमंती करीत २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान सिंधुदुर्गात दाखल, पुण्यातील युवक करतोय जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 5:07 PM