सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत सिंधुदुर्गातील फक्त ७ जणांना संधी मिळाली आहे. बाकीचे सर्व उमेदवार इतर जिल्ह्यातून आले आहेत. यावरुन सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय? असा संतप्त सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारला.जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगारांना उध्वस्त केले जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जान्हवी सावंत, रूपेश राऊळ, संजय पडते, बाळा गावडे उपस्थित होते.राऊत म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल २२ शाळा धोकादायक स्थितीत आहेत. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले जात आहे. राज्याच्या इतिहासात पहिलेच शिक्षण मंत्री आहेत ज्यांना शिक्षणखात्याचा अर्थच कळला नाही हे आमचे दुदैव आहे, असेही ते म्हणाले.तसेच सावंतवाडीत कोसळलेल्या जिल्हा परिषद शाळा नं. १ ची पाहणीही राऊत यांनी केली. तेथील विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला तसेच त्या ठिकाणी शिक्षण घेणार्या मुलांना पर्यायी जागेत बसवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय?, शिक्षक भरतीवरुन विनायक राऊत यांची शिक्षणमंत्र्यावर टीका
By अनंत खं.जाधव | Published: July 05, 2024 5:42 PM