दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीची लॉटरी अखेर सेना-भाजप युतीला लागली. सभापतिपदासाठी युतीच्यावतीने सेनेच्या विशाखा देसाई व आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीच्या सूचिता दळवी यांच्यात लढत झाली. दोघींनाही समसमान प्रत्येकी तीन मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आणि नशिबाची साथ सेनेच्या विशाखा देसाई यांना मिळाल्याने त्या सभापतिपदी विराजमान झाल्या. यामुळे अविश्वास ठरावाने आनंद व्यक्त करणाऱ्या, सभापतिपदाची आशा बाळगलेल्या आघाडीची निराशा झाली. दोडामार्ग पंचायत समितीवर भाजपची सत्ता होती; पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपच्या पंचायत समिती सदस्यांना हाताशी धरून सभापती महेश गवस यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि तो संमतही झाला. त्यानंतर सभापतिपदासाठी शनिवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. सावंतवाडी येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या सूचिता दळवी, तर सेनेच्या विशाखा देसाई यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, भाजपचे तालुकाप्रमुख संदीप नाईक, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र म्हापसेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, संजय गवस, लक्ष्मण आयनोडकर, आदी उपस्थित होते. महेश गवस यांच्यावरील अविश्वास ठरावाने आनंदोत्सव व्यक्त करणाऱ्या आघाडीची मात्र या निवडीमुळे निराशा झाली आहे. चिठ्ठीद्वारे निवड, नशिबाची साथ दोघींचेच अर्ज आल्याने दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी दोघींनाही तीन-तीन मते मिळाली. भाजपचे पं. स. सदस्य महेश गवस, सीमा जंगले यांनी देसाई यांच्या बाजूने, तर उपसभापती आनंद रेडकर, सदस्य जनार्दन गोरे यांनी सूचिता दळवी यांच्या बाजूने मतदान केले. समान मतांमुळे चिठ्ठीद्वारे सभापती निवड करण्याचे ठरविले आणि नशिबाची साथ सेनेच्या विशाखा देसाई यांना मिळाल्याने त्यांची सभापतिपदी निवड झाली. निवडीनंतर युतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
दोडामार्ग सभापतिपदी विशाखा देसाई
By admin | Published: May 08, 2016 12:11 AM