वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी पर्यायाच्या शोधात असलेल्या इच्छुकांमध्ये अन्य प्रभागातील मतदारांची नावे सोयीच्या प्रभागात समाविष्ट करण्याची जोरदार स्पर्धा दिसून येत आहे.
त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत निवडणूक शाखेत २५० ते ३०० अर्ज दाखल झाले असून यासंदर्भात सोमवारी शिवसेना आणि मनसेने मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने फेरबदल करू नये, अशी मागणी तहसीलदारांकडे केली.वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण निश्चित झाले. आरक्षण निश्चितीनंतर अनेक इच्छुकांनी अन्य प्रभागातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.ते ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत; त्या प्रभागात इतर प्रभागातील आपल्या मर्जीतील मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी चुकीची कागदपत्रे जोडून अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मते नेण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.त्याचबरोबर अन्य गावातील हुकमी मते नगरपंचायत कार्यक्षेत्रात दाखल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेद्वार यांच्यात असलेल्या स्पर्धेमुळे आतापर्यंत जवळपास ३००च्या आसपास मतदारांचे अर्ज मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत निवडणूक नायब तहसीलदारांकडे दाखल झाले आहेत.प्रभाग रचनेनंतर मतदारांची अदलाबदल प्रकिया सुरू ठेवणे पूर्णतः चुकीचे आहे. यासंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार करीत विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.एका कर्मचाऱ्याची राजकीय ऊठबसअन्य प्रभागातील मतदारांची नावे सोयीच्या प्रभागात समाविष्ट करण्याची इच्छुकांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच गेला आठवडाभर निवडणूक शाखेतील एक कर्मचारी कार्यालयीन वेळेतही काही राजकीय लोकांसोबत दिसून येतो.
त्या कर्मचाऱ्याचे दुपार आणि रात्रीचे खाणे-पिणेही त्याच राजकीय लोकांसोबत सुरू असल्याचे अनेकांच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून मतदारांची अदलाबदल केली जात असल्याची चर्चा आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने काही प्रकार सुरू असतील तर तशा पद्धतीने नावे समाविष्ट केली जाणार नाहीत. आम्ही सर्व प्रकारची खातरजमा करू. नगरपंचायत निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी असून आपण सहाय्यक आहोत. त्यामुळे मतदार अदलाबदलीची बाब प्रांतांच्या निदर्शनास आणू दिली जाईल,- रामदास झळके, तहसीलदार, वैभववाडी