कणकवली (सिंधुदुर्ग) - लोकशाहीत निवडणुकीसाठीच्या मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे वागदे येथील एका नवरदेवाने विवाहापूर्वी 'आधी मतदान, मगच शुभ मंगल सावधान' असे म्हणत प्रथम ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर विवाहासाठी मंगल कार्यालय गाठले.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे वागदे येथील विनायक परब यांचा रविवारी (आज) विवाह आहे. मात्र, विवाहापूर्वी सकाळी ८ वाजता त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कुटुंबियांसह वागदे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरच विवाहाचा मुहूर्त साधण्यासाठी मंगल कार्यालय गाठले. तसेच लोकशाही बळकट होण्यासाठी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील इतर नागरिकांना केले. विनायक परब यांच्या या कृतीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.