कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे. ६ एप्रिल रोजी निवडणूक मतदान होणार असून, यावेळी नगरपंचायतीचा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक थेट जनतेतून निवडून देण्यात येणार आहेत. आचारसंहिता सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून जाहीर झाली असून ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे.कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर २००३ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. मात्र त्यानंतर सन २००८ व २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुमताच्या आधारावर नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली होती. आता २०१८ मध्ये होणा-या या निवडणुकीत पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रथमच निवडणूक लढवित असून त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच गाव विकास आघाडीही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आता कणकवलीत शहरातील वातावरण तापणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रमकणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता जाहीर झाली. या निवडणुकीचा कार्यक्रम ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी जारी करणार आहेत. १२ मार्चपासून नामनिर्देशन पत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून १९ मार्चपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंच्या कालावधीत ते स्विकारण्यात येणार आहेत. २० मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. २७ मार्च रोजी अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात लक्षवेधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील नगरपंचायत निवडणुकीला फार महत्व आहे. ही नगरपंचायत आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि भाजपा नेते संदेश पारकर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणा-या या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पूर्ण ताकदिनीशी उडी घेतल्याने यावेळची निवडणूक अतिशय रंजक आणि लक्षवेधी असणार आहे.
कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान, रणसंग्रामास प्रारंभ, दिग्गजांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 9:57 PM