वैभववाडी : अत्यंत प्रतिष्ठेच्या करुळ ग्रामपंचायतीच्या माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रात सकाळी १०.३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एकच तारांबळ उडाली.
तहसीलदार संतोष जाधव यांनी तत्काळ मतदान केंद्राला भेट देत मतदानयंत्राच्या बिघाडामुळे थांबलेली मतदान प्रक्रिया तासाभराने सुरळीत केली. तर काही गावात रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या हाती मनी आणि मदिरा लागले. मात्र, लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरणे परस्पर निपटून टाकल्याची सकाळपासून तालुक्यात जोरदार चर्चा होती. तसेच रात्री बाहेरील लोक दुसऱ्या गावात फिरताना आढळल्याने किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, त्याचा मतदान काळात परिणाम झालेला नाही.
करुळमध्ये समर्थ विकास पॅनेलचे आणि ग्रामविकास पॅनेलमध्ये अत्यंत अटीतटीची निवडणूक होत आहे. करुळ माध्यमिक विद्यालयात प्रभाग क्रमांक दोनचे मतदान केंद्र होते. सकाळी १०.३० च्या सुमारास १५२ इतके मतदान झाले असता मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे मतदारांसह उमेदवारांची तारांबळ उडाली. करुळचे निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भरसट यांनी मतदान यंत्राच्या बिघाडाची कल्पना तहसीलदार जाधव यांना दिली. त्यामुळे तहसीलदार जाधव व अव्वल कारकून संभाजी खाडे दुसऱ्या यंत्रासह मतदान केंद्रावर दाखल झाले.
लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविलेनिवडणूक होणाऱ्या काही गावांमध्ये रात्री पोलिसांची गस्त सुरू होती. खोरीतील एका गावात दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांजवळ पोलिसांना मनी आणि मदिरा सापडली. त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यापूर्वीच काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरण परस्पर मॅनेज केले गेल्याची तालुक्यात सकाळपासूनच चर्चा रंगली होती. तर काही गावात बाहेरून गेलेल्या युवकांना स्थानिकांनी हुसकावून लावण्याची चर्चा होती. मात्र, या प्रकारांचा मतदान कालावधीत कोणताही परिणाम झालेला नाही.