सावंतवाडी : सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपुर्णा कोरगावकर, भाजपचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, काँग्रेसचे ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर यांचा समावेश आहे.
ही निवडणूक माजी शिवसेनेचे राज्य मंत्री दीपक केसरकर आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. गेल्या काही वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेवर केसरकरांचे वर्चस्व आहे. तर राणे यांनी संजू परब या युवा नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, भाजपातून बंडखोरी करत परब यांना आव्हान देणाऱ्या अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
८ प्रभागात १७ मतदान यंत्रांवर मतदान होणार आहे. तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये सकाळी ९ पर्यंत १० टक्के मतदान झाले होते. ज्येष्ठांसह, महिला वर्गाचाही मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिसत होता.