रत्नागिरी : ‘खल्वायन’ रत्नागिरीची २०७ वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे उत्साहात झाली. कै. डॉ. के. एन. संकोळी स्मृती संगीत मैफल म्हणून, साजऱ्या झालेल्या या सभेत पुण्याच्या युवा गायिका वृषाली मावळणकर यांचे दमदार गायन झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राघवेंद्र पै यांच्याहस्ते नटराजपूजन, दिपप्रज्वलन होऊन, श्रीफळ वाढविले गेले. श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक व कलाकारांची ओळख करुन दिली. संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हस्ते कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. माधुरी डोंगरे व कोल्हापूरच्या प्रसिद्ध गायिका डॉ. भारती वैशंपायन यांच्याकडे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतलेल्या वृषाली यांनी बागेश्री रागातील ख्याल सादर केला. त्यानंतर पंडित पद्माकर कुलकर्णी यांची ‘जा जा रे जा’ ही अधा त्रितालातील बंदिश याला जोडून ‘डारो रंग मोपे’ ही पारंपरिक बंदिश व नंतर तराणा सादर केला. त्यांनतर रागमाला सादर करुन मिश्र पहाडीमधील दादरा सादर केला. कवी ब्रह्मानंद यांचे डॉ. माधुरी डोंगरे यांनी संगीत दिलेले एक हिंदी भजन व नंतर माणिकतार्इंचे ‘हसले मनी चांदणे’ हे गीत त्यांनी सादर केले. शेवटी डोंगरे यांचे शब्द व संगीत असलेले ‘तुजविण कोण आम्हा, तारील रामराया, रामा तुझ्या कृपेची राहो, उदंड छाया’ हे भैरवीतील पद गाऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. राजू धाक्रस व मधुसूदन लेले यांनी साथसंगत केली.मैफल यशस्वीतेसाठी जांभेकर विद्यालय, र. ए. सोसायटी, विनय वळामे, राजू बर्वे, संजू बर्वे, दिलीप केळकर यांचे सहकार्य लाभले. खल्वायनच्या या कार्यक्रमाचा अनेकांनी आनंद घेतला. (प्रतिनिधी)
वृषाली मावळंकर यांच्या दमदार गायनाने रंगली मैफल
By admin | Published: January 18, 2015 11:17 PM