सावंतवाडी : भाजी विक्रेत्यांवर कारवाई झाल्यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी संबंधित कारवाई ही प्रशासनाचा भाग आहे. त्यामुळे दोन दिवस थांबा, आपण यावर सुवर्णमध्य काढू, प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागू, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नगराध्यक्ष परब यांनी विक्रेत्यांना दिला. विक्रेत्यांनी नगराध्यक्षांची भेट घेत आपली बाजू मांडली.सकाळपासून सुरू असलेल्या वादानंतर पुन्हा भाजी विक्रेते नगराध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी गेले, त्यावेळी परुळेकरांना आपण बोलावले नव्हते, आम्हाला न्याय पाहिजे, राजकारण नको, त्यामुळे आम्हाला नगराध्यक्षांनी न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी परब यांनी सर्व भाजी व्यावसायिकांशी चर्चा केली.
मी स्वत: किंवा मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही, तर पत्रानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तरीही कोणावर कारवाई होऊ नये, यासाठी माझी भूमिका आहे. त्यासाठी दोन दिवस जरा कळ काढा, आपण योग्य तो निर्णय घेऊ. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी आपण चर्चा करू, प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ, अन्यथा आंदोलन करू. परंतु कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, अजय गोंदावळे, अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.व्यवसाय करायचा आहेपरब यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉ. जयेद्र परुळेकरांना आपण बोलावले नव्हते. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. आम्हाला राजकारण करायचे नाही, तर आम्हाला आमचे दुकान लावून व्यवसाय करायचा आहे, असे उपस्थित भाजी विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, जयेंद्र परुळेकरांना मी ओळखत नाही. ते चुकीच्या पध्दतीने पत्र वाचन करीत असल्यामुळे त्यांना मी सभागृहाच्या बाहेर काढले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.