महादेव भिसे : आंबोली पावसाच्या अभावी प्रवाहीत न झालेल्या धबधब्यांमुळे आंबोलीतील धबधब्याच्या आकर्षणामुळे मौजमजेसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालीची घट झाली आहे. रविवार असूनही आंबोलीत पर्यटकांची गर्दी झालेली दिसून आली नाही. आंबोलीत आलेल्या काही पर्यटकांना येथील रिमझिम पावसातच मजा करत घरची वाट धरावी लागली. तुरळक पडलेल्या पावसामुळे मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे आंबोलीला पर्यटकांची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्यात आगमन होणाऱ्या पावसाने दगा देत जुलै महिन्यातील मुहूर्त धरला. आणि त्यामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह सर्व छोटे धबधबेही पाण्याशिवाय कोरडे भासत आहेत. येथील पावसात परसरणाऱ्या धुक्याची मजाही पर्यटकांना घेता येत नाही. कावळेसाद पॉर्इंटवर पहावयास मिळणारी गर्दीही दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटकांशिवाय आंबोलीत परराज्यातून येणारे पर्यटक कमी झाल्याने व्यावसायिकही चिंतेत आहेत. येथील जंगल भ्रमंती, वन्यजीवांमधील विविधता यांच्यासाठी काही पर्यटक येत आहेत. मात्र, पावसाअभावी जैवविविधतेची मजा, विविध साप व बेडूक यांचे दर्शन मिळणे काहीसे अवघड झाले आहे. रविवार असूनही आंबोलीमध्ये सुमारे सातशे ते आठशे पर्यटकांचे आगमन झाले. यातील बरीचसे पर्यटक जिल्ह्यातील होते. यामुळे येथील व्यवसायावरही परिणाम झाल्याचे दिसून आहे. रविवारी दिवसभर पडणाऱ्या संततधार पावसामुळे आंबोलीतील शेतकरी वर्ग व पर्यटन व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे व्यावसायिक चिंतेतच आहेत. आंबोलीत रविवारी कोल्हापूर व बेळगाव येथीलही पर्यटकांनी काही प्रमाणात प्रवाहीत झालेल्या धबधब्यामध्ये आनंद लुटला. आंबोलीत या रविवारी जरी अल्प प्रतिसाद लाभला असला तरी पावसाने सुरुवात केली असल्याने पर्यटकांच्या रांगा लागतील, असा आशावाद येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पर्यटकांची प्रतीक्षा
By admin | Published: July 06, 2014 11:10 PM