नीलेश मोरजकर ल्ल बांदाबांदा शहर व परिसरात एप्रिल महिन्याच्या अखेरीसच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने व तेरेखोल नदीपात्र कोरडे पडू लागल्याने ऐन मे महिन्यात या परिसरातील जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या भागातील पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने स्थानिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.बांदा परिसरातून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी सुरु असलेले दुरुस्तीचे काम यामुळे कालव्यातील पाणी हे कमी क्षमतेने सोडण्यात आले आहे. पालापाचोळा व कचऱ्याने कालवा अस्वच्छ झाल्याने सोडण्यात आलेले पाणीदेखील गढूळ झाले आहे.यावर्षी उष्णतेच्या झळा वाढल्याने याचा गंभीर परिणाम पाणीसाठ्यांवर झाला आहे. बांदा शहरातील जनतेलाही पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. शहरातील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तेरेखोल नदीपात्र कोरडे पडल्याने याचा परिणाम या नदीपात्रावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर झाला आहे. तेरेखोल नदीपात्रावर बांदा शहर, वाफोली, विलवडे, ओटवणे, इन्सुली, शेर्ले गावांच्या नळपाणी योजना आहेत. ग्रामीण भागात बारमाही वाहणारे ओहोळ व जलस्त्रोत हे देखील आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.बांदा परिसरातील मुख्य जीवनवाहिनी असलेली तेरेखोल नदी ही एप्रिल महिन्यातच ठिकठिकाणी कोरडी पडलेली आहे. भरतीच्या वेळी येणारे समुद्राचे खारे पाणी हे बांद्यापर्यंत येत असल्याने नदीपात्रातील पाणी खारे झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने व शेतीसाठीदेखील वापरता येत नसल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर बनली आहे. खारे पाणी शेती बागायतींना वापरता येत नसल्याने परिसरातील शेती व शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेल्या बागायती करपल्या आहेत. तीव्र पाणीटंचाईमुळे तेरेखोल नदीपात्रावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना देखील धोक्यात आल्या आहेत. बांदा शहराची वाढती लोकसंख्या हे याठिकाणी असलेली बाजारपेठ यामुळे बांदा शहरात पाण्याची मागणी ही वाढतीच असते. अशा परिस्थितीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहेत.३८ वर्षांपूर्वी वाफोली परिसरात हरितक्रांती होण्यासाठी इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले लघु पाटबंधारे विभागाचे धरण देखील यावर्षी एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. उन्हाळ्याच्या झळा या तीव्र असल्याने पाण्याअभावी स्थानिकांना भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. धरणात सुरुवातीच्या काळात मुबलक पाणीसाठा होत असल्याने हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला होता. मात्र, कालांतराने धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने धरणातून पाणी गळती होऊ लागली. याचा विपरीत परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा विपरीत परिणाम होतो. यावर्षी एप्रिल महिन्यातच धरणातील पाणीसाठा हा पूर्णपणे आटला आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने वाफोली गावातील शेती बागायती पूर्णपणे करपून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळयात या धरणातील पाणीसाठा कमी होतो.दरवर्षी धरण कोरडे पडत असल्याने उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षी दुरुस्तीचे केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असल्याने या धरणाची परिस्थिती गंभीर बनली आहे. धरणाची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात ओव्हरफ्लो होत असलेले हे धरण एप्रिल महिन्यातच कोरडे पडत आहे. प्रत्यक्षात पावसाचे आगमन होण्यासाठी अजून दीड महिन्याचा कालावधी असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
बांदा परिसरात पाण्यासाठी होणार भटकंती
By admin | Published: April 20, 2017 10:47 PM